योहान १०:२७

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*

                *प्रभात तारा*

            *✨ख्रिस्ताची मेंढरे✨*

*माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात..✍*
               *( योहान १०:२७ )*

                          *...मनन...*

           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*

       प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा येथे मेंढपाळाचे प्रतीक घेऊन यहूद्यांना आठवण करून दिली आहे की, ते जर त्याची खरी मेंढरे असती तर त्यांनी त्याची वाणी ऐकली असती. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला लागतो तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर चालायला लागण्याची आवश्यकता आहे. कारण केवळ आमचा त्याच्यावर विश्वास आहे असे म्हणून नव्हे तर विश्वासाबरोबरच आम्ही कृती करणेही गरजेचे आहे, कारण कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे. प्रभूबरोबर चालत असताना त्याच्यासोबत जुळलेल्या नात्यात आम्ही वाढत राहिले पाहिजे.

        उत्तम मेंढपाळ म्हणजेच उत्तम मार्गदर्शक होय. प्रभू आम्हाला म्हणजेच त्याच्यासोबत चालणाऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करतो, व आमची काळजी घेतो, आमच्यावर लक्ष ठेवतो. ख्रिस्ताची मेंढरे त्याला आपला मेंढपाळ म्हणून ओळखतात आणि त्याचे प्रभुत्व मानून त्याच्या आज्ञा पाळतात आणि त्याची वाणी त्याच्या मागे मागे चालतात. त्याची वाणी ऐकण्यासाठी आणि त्याच्यामागे चालण्यासाठी आम्ही काय करण्याची आवश्यकता आहे ? वचनाद्वारे पाहू या...

   *१) देवाची वाणी ऐकली पाहिजे -* परमेश्वर आपल्याबरोबर दृष्टांताद्वारे, वचनाद्वारे, संदेष्ट्यांद्वारे, स्वप्नांद्वारे बोलतो ते आपण ऐकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. बायबल मधूनही अनेक वचनांद्वारे तो आपल्याला शिकवतो, आपल्याशी बोलतो. असे लिहिले आहे की, *प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यासाठी उपयोगी आहे. ( २ रे तीमथ्य ३:१६)* त्याप्रमाणे आपण त्याची वाणी ऐकून त्याप्रमाणे चालले पाहिजे.

   *२) आम्ही देवाबरोबर बोलले पाहिजे -* आम्ही रोज आणि रोज, वेळ मिळेल तेव्हा, तेव्हा देवाबरोबर बोलले पाहिजे. प्रार्थनेद्वारा त्याच्याबरोबर संवाद साधला पाहिजे. आपण त्याच्याबरोबर बोललो की तो आपल्याला निश्चितच प्रतिसाद देतो. असे लिहिले आहे की, *तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. ( योहान १५:७)* परमेश्वर आपले अंतःकरण जाणतो. आमच्या भावना, आमच्या गरजा, आमच्या सर्व अडचणी त्याला माहीत आहेत, तो त्यांची पूर्तता करतो.

    *३) आम्हाला मिळालेल्या नवीन कुटूंब आणि आप्त, मित्र ह्यांच्याबरोबर बोलले पाहिजे -* ख्रिस्तावरील विश्वासात वाढत असताना आमच्याबरोबर वाटेकरी असणाऱ्यांशी आम्ही संपर्क साधतो तेव्हा त्या बोलण्याद्वारे परस्परांना उत्तेजन मिळते आणि आम्ही एकमेकांवर ख्रिस्तामध्ये प्रीति करायला लागतो. असे लिहिले आहे की, *आणि प्रीति व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा. ( इब्री १०:२४,२५)*

   *४) आम्ही इतरांनाही ख्रिस्ताविषयी सांगितले पाहिजे -* अजून ज्यांना ख्रिस्त माहीत नाही, अशांना आम्ही ख्रिस्ताविषयी सांगितले पाहिजे. आणि हे करत असताना आम्हीही ख्रिस्ताला आवडेल असे म्हणजेच ख्रिस्तासारखे आचरण केले पाहिजे म्हणजे आमची बदललेली जीवने पाहून आणि त्यांच्याबद्दलची आमची तळमळ पाहून ते आमचे म्हणणे ऐकतील. अशा लोकांना ख्रिस्तामध्ये आणण्यासाठी आम्ही त्याचे प्रतिनिधी व्हावे अशी त्याची इच्छा आहे. असे लिहिले आहे की, *त्याने त्यांना म्हटले, माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. ( मत्तय ४:१९)*

        प्रियांनो, आम्ही देवाची वाणी ऐकून त्याच्या मार्गाने चालले पाहिजे. तो आजही आम्हाला आवाज देत आहे, बोलावित आहे. त्याची वाणी ऐकून जो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्याबद्दल लिहिले आहे की, *धर्मशास्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करितो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे. ( नीति २८:९)* सर्वच विश्वासणाऱ्यांचे प्रभूबरोबर सारखेच नाते असेल असे नाही. परंतु आपल्याला खऱ्या ख्रिस्ताची ओळख झालेली आहे, तेव्हा आपण देवाचे ऐकले पाहिजे, त्याला योग्य असा प्रतिसाद दिला पाहिजे, आणि परमेश्वर आणि दूसरे विश्वासणारे आपले बहीण भाऊ ह्यांच्याबरोबर कायम सहभागिता ठेवली पाहिजे. आणि अनेक आत्मे प्रभूच्या राज्यात यावेत म्हणून आपल्या जीवनातील साक्ष इतरांना सांगून त्यांना प्रभूकडे येण्यासाठी मार्गदर्शक बनून प्रभूसाठी आत्मे जिंकणारे असे झाले पाहिजे.

*आम्ही ख्रिस्ताची मेंढरे झालो तरच तो आमचा मेंढपाळ होईल. आणि ख्रिस्ताच्या मेंढरांचा कधीही नाश होणार नाही. कारण तो आमचे संरक्षण करतो.*

          *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*   

     *परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*

                         *प्रार्थना -:*

         *परमपवित्र परमेश्वरा, आमच्या जिवंत देवा, तुझी स्तुती करते, तुला सर्व आदर, मान, महिमा, गौरव देते. सुंदर वचनाद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतोस म्हणून तुझे उपकार मानते. होय प्रभो, आम्ही तुला स्वीकारले तसे अनेकांनी तुला स्वीकारावे. आणि त्यांनी तुझ्या समक्षतेत यावे. त्यांनी विश्वासाने तुझ्यामागे चालावे आणि आशीर्वादित होऊन सार्वकालिक जीवन मिळवावे ह्यासाठी अनेकांना तुझ्या राज्यात आणण्यासाठी आमचा उपयोग करून घे. तुझी सुवार्ता अनेकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्हाला साहाय्य कर. ही प्रार्थना तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आमचा उद्धारक ह्याच्या पवित्र नावाने केली म्हणून पित्या तू ऐक.*

           *आमेन आमेन आमेन..!!*

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

                      *वंदना जाधव*
                        *अहमदनगर*
                            *बुधवार*
                  *१० सप्टेंबर २०१९*


Yeshu Masih

Comments

Popular posts from this blog

Dream And Visions

फिलिप्पै २:९,१०