लूक १०:४२

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*

                 *🌟प्रभात तारा🌟*

         *✨चांगला वाटा निवडा✨*

*परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे, मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही..✍*
                   *( लूक १०:४२ )*

                          *...मनन...*

           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*

           मार्था व मरीया या ज्या लाजरला येशूने मरणातून उठविले होते त्याच्या या दोन बहीणी होत्या. प्रभू येशू त्यांच्या घरी आला असता मार्था आदरातिथ्य करण्यात गुंतली आणि मरीया तिला मदत करीत नाही म्हणून ती तिला दोष देत होती. तिची कुरकुर ऐकून प्रभू तिला वरील वचनाद्वारे बोलत आहे. मरीया तर प्रभूच्या चरणांपाशी बसून प्रभूचे भाषण ऐकत बसली होती. कारण मरीयेला आत्मिक भूक लागली होती. ती प्रभूचे ऐकण्यास व त्याची महानता ओळखण्यास उत्सुक होती. तिने आपली आत्मिक गरज ओळखून चांगला वाटा निवडून घेतला होता. तो तिच्यापासून कुणीच काढून घेऊ शकणार नव्हते. येशूसाठी भरपूर पक्वान्ने करण्याऐवजी येशूचे भाषण ऐकणे जास्त महत्वाचे होते. कृतीशील जीवनाच्या तुलनेत चिंतनशील जीवनाचे मोल व महत्व अधिक आहे. येशूची जगीक सेवा करण्यातच केवळ गुंतून न राहता त्याच्याकडून आत्मिक शिक्षणही घेणे खूप आवश्यक आहे. त्याच्या गरजा भागविण्यासाठी विपूलपणे तरतूद करीत राहण्यापेक्षा त्याचे ऐकल्यानेच त्याचा अधिक आदर व बहुमान होतो. वचन सांगते, *नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा. ( योहान ६:२७)*

        मार्थाही प्रभूची सेवा करत होती. पण ज्या आत्म्याने ती करत होती तो चुकीचा होता. आपण प्रभूसाठी जे काही करतो ते करत असताना आत्म्याने परिपूर्ण होऊन ते केले पाहिजे. आम्ही जगिक गोष्टींच्या द्वारे त्याची सेवा करू नये, त्याने परमेश्वर प्रसन्न होत नाही. आपण शांत मनाने, त्याच्या सान्निध्यात बसून आपल्या जीवनाविषयी त्याची काय इच्छा आहे हे जाणून घेण्याने तो प्रसन्न होतो. आम्ही आमच्या मनानुसार आणि शरीरानुसार जे काही करतो त्याने तो प्रसन्न होत नाही. आमची स्वतःची इच्छा किंवा अभिलाषा पूर्ण करण्याने केवळ क्षणिक आनंद मिळतो व आपण रिक्तच राहातो परंतु प्रभूच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्या लीन आणि नम्र जनांना तो उंच करतो. देवाच्या कोणत्याही चांगुलपणासाठी आम्ही योग्य नाही. आमची पात्रता नसताना तो आम्हाला उंच करतो.

         आपणांस पाहावयास मिळते की, काही लोकांचे संजीवन टिकणारे नसते तर तात्कालिक असते. समुद्रातून उठणाऱ्या एका तरंगासारखे असते. त्यांच्या प्रार्थनेमध्येही केवळ मागण्या आणि मागण्याच असतात. आम्ही तसे न करता जागृत राहून प्रार्थना केली पाहिजे. येशूने शिष्यांना म्हटले, *"तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे." ( मत्तय २६:४१)* आपले अंतर्याम पवित्र आत्म्याने बलसंपन्न झाले पाहिजे. म्हणजे मग त्याद्वारे आम्ही कठीण मार्गातही धैर्याने वाटचाल करू शकतो. त्यासाठी आम्ही आत्म्यामध्ये चालले पाहिजे, आत्म्याद्वारे चालविले गेलो पाहिजे, आत्म्याचे अनुकरण केले पाहिजे. आणि आमच्या इच्छेचे आम्ही समर्पण केले पाहिजे. आमचे विचार, आमचे आचरण, प्रभूला आवडणारे आणि शुद्ध, पवित्र असले पाहिजे. म्हणजे प्रभूच्या आगमनसमयी जे उचलले जाणार आहेत त्यांच्यामध्ये आमचीही गणना होईल. आणि प्रभूबरोबर आम्ही वर उचलले जाऊ. म्हणून प्रियांनो, आम्ही आमचे लक्ष जगीक गोष्टींकडे नाही तर वरील, प्रभूच्या गोष्टींकडे लावले पाहिजे. मरीयेप्रमाणे प्रभूच्या चरणी बसून त्याचे वचन वाचण्यात, मनन करण्यात आम्ही आमचा वेळ घालविला पाहिजे.

         *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*

     *परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*

                         *प्रार्थना -:*

       *प्रभो परमेश्वरा, आमच्या सेनाधीश देवा, तुझी स्तुती करते, तुला सर्व आदर, मान, महिमा, गौरव देते. सुंदर वचनाद्वारे आमच्याशी बोलतोस म्हणून तुझे उपकार मानते. होय बापा, आम्ही मरीयेप्रमाणे आत्मिक वाटा उचलावा जेणेकरून तुझ्या पुत्राच्या आगमनसमयी आम्ही त्याच्याबरोबर उचलवे जाऊ. आम्ही आध्यात्मिक गोष्टी म्हणजेच तुझ्या वचनाला आणि तुला आमच्या जीवनामध्ये प्राधान्य द्यावे, प्रथम स्थान द्यावे असे तुझ्या दयेने व कृपेने होऊ दे. ही प्रार्थना तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याच्या पवित्र नावाने मागते म्हणून पित्या तू ऐक.*

          *आमेन आमेन आमेन..!!*

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

                      *वंदना जाधव*
                       *अहमदनगर*
                           *शनिवार*
                     *७ सप्टेंबर २०१९*

Comments

Popular posts from this blog

योहान १०:२७

Dream And Visions

फिलिप्पै २:९,१०