रोमकरांस पत्र ७:११




रोमकरांस पत्र ७:११
रोमकरांस पत्र ७:११



*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*

                 *🌟प्रभात तारा🌟*

      *✨मीपणा सोडून द्या✨*

*मी नियमशास्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो..✍*
                       *( रोमकरांस पत्र ७:9)*

                           *...मनन...*

          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*

     प्रत्येक मनुष्यामध्ये पाप वस्ती करते, व पापाच्या धोरणाप्रमाणे तो वागत असतो. त्याच्या ठायी असलेली कितीतरी कृत्ये देवाच्या दृष्टीने पाप आहेत. पण नियमशास्रावाचून त्याला ते कळत नाही, त्याची जाणीव होत नाही. त्याला वाटत राहाते की तो खूप सुखी, आनंदी आहे. पापांमुळे तो  देवाच्या सहभागितेतून वेगळा केलेला आहे हे त्याला माहीत नसते. परंतु देवाच्या आज्ञा ऐकल्यानंतर पापांची जाणीव होते आणि देवापासून दूर असल्यामुळे पापामध्ये जगत असल्याचे समजते. आणि आपण पापात मेलेलो आहोत असे दिसून येते. पौल म्हणतो, *तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. ( इफिस २:१)* परंतु आता आम्ही ख्रिस्तामध्ये जगत आहोत, त्यामुळे आम्ही ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित असे जीवन जगले पाहिजे. पौल म्हणतो, *तुम्ही आपले अवयव पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःला देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. ( रोम ६:१३)*

       आपण पाहातो की, सैतान हा सुद्धा एक पवित्र देवदूत म्हणून तयार करण्यात आला होता. ( यशया १४:१२) त्याचे पतन होण्यापूर्वीचे त्याचे नाव लुसिफर होते. यहेज्केल २८:१२:१४ मध्ये वर्णन केले आहे की सैतान एक करूबिम म्हणून निर्माण केला होता, तसे पाहिले असता तो एक उच्च श्रेणीचा देवदूत म्हणून निर्माण केला गेला होता परंतु त्याला त्याच्या सौंदर्याचा आणि पदाचा गर्व झाला. त्याच्याकडे वरचेवर पाहता सर्वात जास्त निर्माण केलेले अनेक देवदूत आणि त्यांची सुंदरता आणि पदामुळे ते गर्विष्ठ झाले आणि देवाच्या सिंहासनावर बसावे असे त्याने ठरविले. ( यशया १४:१३-१४, यहेज्केल २८:२५, १ ले तीमथ्य ३:६) सैतानाच्या गर्वामुळे त्याला देवापेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत असे वाटले आणि देवाच्या सिंहासनावर बसण्याची लालसा त्याला उत्पन्न झाली. यशया १४:१२-१५ मध्ये असे अनेक विधाने या मीपणा विषयी दिसतात. त्याच्या या पापामुळे त्याचे पतन झाले. त्याला स्वर्गातून खाली फेकण्यात आले आणि देवाने त्याला परत स्वर्गात येण्यास प्रतिबंध केला. 

       ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनातील स्वत्व किंवा मीपणा सोडून देणे आणि देवाला आपल्यामध्ये राहू देणे हेच समर्पित जीवन आहे. विजयी आणि आशीर्वादित जीवन जगण्याचा उत्तम व योग्य मार्ग हाच आहे. देवाचा आपल्याविषयीचा संकल्प, आपल्याविषयीच्या योजना त्याला आपल्यामध्ये व आपल्याद्वारे पूर्ण करू द्यावेत. पौल म्हणतो, *मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो.* आम्ही ख्रिस्ताला आमच्या जीवनात जेव्हा आम्ही प्रवेश करू देतो तेव्हा आमचे जीवन परिपूर्ण होते. त्यासाठी आम्हाला आमच्यामध्ये असलेला मीपणा काढून टाकणे गरजेचे आहे, पौल म्हणतो,  *किती मी कष्टी माणूस ! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील ?  ( रोम ७:२४)* आणि जेव्हा आम्ही आमच्या ठायी असलेल्या या *मी* ला काढून टाकतो, तेव्हा जो परिपूर्ण आहे, तो ख्रिस्त आत येतो. कारण जेव्हा *मीपण संपते तेव्हाच ख्रिस्त आमच्यामध्ये येतो* आणि ख्रिस्त आमच्यामध्ये येतो तेव्हा आमचे जीवन बदलून जाते. आमचे जीवन ख्रिस्ताच्या सामर्थ्याच्या अधीन होते. पराजयाची जागा जय घेतो, दुःख, कष्ट संपतात आणि आमचे जीवन आनंदाने, हर्षाने भरून जाते. आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये कार्य करणारा नियम आम्हाला या जगाच्या व पापाच्या पलीकडे वर उचलून धरतो. जेणेकरून आमच्यावर आता पापाची सत्ता चालणार नाही. आम्ही आता पापाच्या बंधनात नाही. 

      म्हणून प्रियांनो, *मीपणाने* भरलेल्या आमच्या जीवनातून बाहेर येऊन आत्म्याने भरलेल्या जीवनात आम्ही प्रवेश करावा. कारण *मीपणापासून* काहीही लाभ होणार नाही तर अपयशाशिवाय काहीच निष्पन्न होणार नाही.म्हणून आम्ही आमचे जीवन ख्रिस्ताकडे सोपवून द्यायचे आहे म्हणजे तो आम्हाला आपल्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण करील. 

*अहंपणा सोडून पुत्राकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, तो तुम्हाला विजयी जीवन देईल.*

         *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*

     *परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*

                            *प्रार्थना -:*

         *परमपवित्र परमेश्वरा, आमच्या सेनाधीश देवा, तुझी स्तुती करते, तुला सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान देते. सुंदर वचनाद्वारे आम्हाला बोध करतोस म्हणून तुझे उपकार मानते. होय प्रभो, आमच्यातील सर्व गर्व, अहंकार, ताठा काढून टाक, आणि ख्रिस्ताप्रमाणे आम्हाला लीन आणि नम्र कर. आमच्यातील सर्व गुप्त पापे काढून टाक आणि आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. मीपणा सोडून देऊन, तुझ्या चरणापाशी आम्ही लीन आणि नम्र होऊन यावे अशी कृपा तू आमच्यावर कर. ही प्रार्थना तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त, आमचा उद्धारक ह्याच्या पवित्र नावाने करते म्हणून पित्या तू ऐक.*

          *आमेन आमेन आमेन..!!*

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

                    *वंदना जाधव*
                       *अहमदनगर*
                          *बुधवार*
                  *४ सप्टेंबर २०१९*

Comments

Popular posts from this blog

योहान १०:२७

Dream And Visions

फिलिप्पै २:९,१०