२ रे करिंथ १२:९

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*

                  *🌟प्रभात तारा🌟*

             *✨देवाची महान कृपा✨*

*परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे..✍*
            *( २ रे करिंथ १२:९ )*

                          *...मनन...*

           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*

          ख्रिस्त आम्हाला सदोदित आनंद, समाधान देतो. असामान्य कार्यासाठी आम्हाला असामान्य सामर्थ्य पुरवितो. म्हणजेच ख्रिस्त ज्या अंतःकरणात वसती करतो तेथे सामर्थ्य, धैर्य, आनंद व समाधान यांचीही वसती असते. प्रियांनो, अनुभवाने आपल्याला ठाऊक आहे की, देवाच्या कृपेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. पवित्र शास्रात आपण अनेक ठिकाणी वाचतो, "कृपेची भरपूरी", कृपेची विपुलता, महान कृपा, नवीन कृपा, इत्यादि. देवाची कृपा म्हणजे आम्ही अपात्र असताना आमच्यावर झालेली मेहेरबानी. त्याचे नीतिमत्व तो मला देतो. हीच त्याची अद्भूत कृपा आहे. पुरे म्हणजे, पुरून उरणारी. म्हणजे ओसंडून वाहणारी. ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता म्हणतो, *माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. ( स्तोत्र २३:५)* त्याप्रमाणे काठोकाठ भरून वाहणारी.

        आध्यात्मिक रितीने आपण अरण्यात राहतो. आणि या अरण्याच्या मार्गामध्ये अनेक परीक्षा, संकटे, मोहपाश, कठीण परिस्थिती या सर्व अनुभवातून जावे लागते. या अनुभवातून जात असताना, आपल्याला " कृपेची" गरज आहे. ही कृपा आपण कोठून प्राप्त करू शकतो ? ही कृपा आपणांस कोण देईल ? प्रियांनो, ही कृपा आम्हाला फक्त प्रभू येशूच्या द्वारेच मिळू शकते. प्रभू येशूने कृपा आणि सत्य यांनी परिपूर्ण अशी आम्हामध्ये वस्ती केली. *शब्द देही झाला, आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. ( योहान १:१४)* तसेच पूढे आणखी असे वाचतो की, *कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली.* असे लिहिले आहे की, *त्याच्या पूर्णतेतून आपणां सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. ( योहान १:१६)*

         लीन आणि नम्र जणांना ही कृपा देण्यास येशू सदैव तयार आहे. *तो अधिक कृपा करितो...तो गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. ( याकोब ४:६ व १ ले पेत्र ५:५)* जेव्हा आपण साहाय्यार्थ वर म्हणजेच देवाकडे पाहतो तेव्हा आपल्या अंतर्यामी आपण देवाची वाणी ऐकू शकतो. माझी कृपा तुला पुरेशी आहे. पुरेशी कृपा पूरविण्यास व सूटकेचा मार्ग तयार करण्यास आपला प्रभू येशू विश्वासयोग्य आहे. यासाठी की, आपण ते सहन करण्यास समर्थ असावे. देवाची काही लेकरे मोहपाश, परीक्षा, संकटे येताच अडखळतात. याचे कारण हेच आहे की त्यांना समजत नाही की ही परीक्षा देवाच्या परवानगीनेच आम्हांवर आलेली आहे. ती अशासाठी की, या संधीचा उपयोग करून त्यातून विजयाने बाहेर पडावे. कारण आपल्याला पुरेशी कृपा देण्यास आपला देव, आपला राजा, आपला प्रभू, आपला येशू विश्वासयोग्य आहे.

         पवित्र शास्रात आपण पाहातो की, देवाची कृपा प्राप्त केलेली पहिली व्यक्ती नोहा होता. ( वाचा उत्पत्ति ६:८) त्या काळात त्या दुष्टाईने भरलेल्या जगात नोहा हा एकमेव धार्मिक व सात्विक आणि देवाला प्रिय असा होता. म्हणूनच देवाने त्याच्यावर कृपा करून त्याचा व त्याच्या परिवाराचा बचाव केला. आपणही या दुष्ट जगात वावरत असताना, संकटे, क्लेश, परीक्षा  यामध्ये देवाची कृपा प्राप्त करून घेऊन या जगावर जय मिळविला पाहिजे. नवीन करारामध्ये आपण पाहातो की, मरीयावर देवाची कृपा झाली. या अंधकारमय जगात, या दुष्ट व कुटील लोकांमध्ये ती एकच स्री होती की, जी पवित्र बाळ जो आपल्याला प्रकाशात आणणारा येशू यास जगामध्ये आणण्यासाठी ती कृपा प्राप्त करण्यास योग्य होती. तिला त्यासाठी अनेक प्रकारच्या निंदा, अपमानातून जावे लागले, परंतु ती कृपेने भरलेली असल्यामुळे ती त्यावर विजय मिळवून अनंतकालीन परमेश्वराची अनंतकालीक योजना पूर्ण करू  शकली. मरीयेवर देवाने केलेल्या कृपावृष्टीमुळे तिला त्वरित निर्णय घेण्यास साहाय्य प्राप्त झाले व ती आज्ञापालन करून म्हणू शकली, *"तुझ्या वचनाप्रमाणे मला प्राप्त होवो."* देवाची योजना आम्ही पूर्ण करू इच्छितो का ? आम्हाला देवाची महान कृपा प्राप्त करायची आहे का ? चला तर या, आपण त्या कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या, आपल्याला कृपा देणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या जवळ जाऊ या, आपल्या मागण्या आणि विनवणीपेक्षा तो अधिक देण्यास तयार आहे, त्याची कृपा आपल्याला पुरेशी आहे. आपण या जगात जगत असताना विश्वासाने कबूल करून म्हणू या.. *"तुझी कृपा मला पुरे आहे. "*

         *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*

     *परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*

                         *प्रार्थना -:*

        *दयाळू आणि कृपाळू  परमेश्वरा, आमच्या सेनाधीश देवा, तुझी स्तुती करते, तुला सर्व आदर, मान, महिमा, गौरव देते. सुंदर वचनाद्वारे आमच्याशी बोलतोस म्हणून तुझे उपकार मानते. होय बापा, खरोखरच आमची काहीही पात्रता नसताना, काहीही योग्यता नसताना प्रभो तू आम्हांवर दया करतोस, कृपेवर कृपा करतोस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये राहून, तुझ्या वचनाप्रमाणे वागून, तुझ्या आज्ञांचे पालन करून तुझ्या कृपेमध्ये अधिक आणि अधिक वाढत जावे यासाठी आम्हाला साहाय्य कर, मार्गदर्शन कर. ही प्रार्थना तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याच्या पवित्र नावाने मागते म्हणून पित्या तू ऐक.*

          *आमेन आमेन आमेन..!!*

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

                      *वंदना जाधव*
                       *अहमदनगर*
                           *बुधवार*
                     *५ सप्टेंबर २०१९*

Comments

Popular posts from this blog

योहान १०:२७

Dream And Visions

फिलिप्पै २:९,१०