इब्री १२:१४

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*

                *🌟प्रभात तारा🌟*

  *✨पवित्रीकरण मिळविण्याचा प्रयत्न करा✨*

*सर्वांबरोबर 'शांततेने राहण्याचा' व ज्यावांचून प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळविण्याचा 'झटून प्रयत्न करा'..✍*
                   *( इब्री १२:१४ )*

                          *...मनन...*

         *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*

           आपण दोन गोष्टींच्या मागे लागले पाहिजे, सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर चांगले व शांतीचे संबंध ठेवले पाहिजेत आणि देवाच्या दृष्टीत देवासमोर पवित्र असे आचरण ठेवले पाहिजे. आपण या दोन गोष्टींकरिता झटले पाहिजे.   विश्वासणाऱ्याचे वर्तन सुधारण्याकरिता व त्याला शिस्त लागावी म्हणून देव त्यालाही शिक्षा करीत असतो. शिक्षा फक्त पापी लोकांसाठीच नाही तर विश्वासणाऱ्यांसाठी देखील आहे. *तो करितो ती शिक्षा आपल्या हितासाठी, कारण आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करितो. ( इब्री १२:१०)* ह्यासाठी की,  जगाच्याबरोबर आपल्याला दंड होऊ नये म्हणून देव स्वतःच आम्हाला शिक्षा करीत आहे. प्रेषित पौल म्हणतो, *आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्याअर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्याअर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंड होऊ नये. ( १ ले करिंथ ११:३१,३२)*

         'आम्ही देवाच्या पवित्रतेमध्ये सहभागी व्हावे' अशी देवाची योजना आहे. त्यामुळे वर्तमानकाळी 'पवित्र होणे' आणि 'पवित्र राहाणे' हे आमचे कर्तव्य आहे. देवाच्या पवित्रतेत वाटेकरी होणे शक्य व्हावे म्हणून तोच आमच्या जीवनात कार्य करीत आहे. कर्माप्रमाणे न्याय फक्त परमेश्वरापाशीच आहे. आणि हा न्याय पापांबद्दल नाही कारण ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळले जाण्याने पापाचा न्याय वधस्तंभावर पूर्वीच झालेला आहे. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला पापाच्या न्यायाला पुन्हा तोंड द्यावे लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की, *जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. ( योहान ५:२४)* आणि आणखी रोमकरांस पत्रामध्ये असे लिहिले आहे की, *ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच ( रोम ८:१)*

      *ज्याचा परिणाम मरण आहे, असे पाप केव्हा होते ? प्रियांनो, जेव्हा विश्वासणारा जाणूनबूजून पाप करतो, पापाच्या अधीन होऊन राहातो, ख्रिस्ताच्या नावाला आपल्या पापाचरणामुळे भ्रष्ट करतो, आणि देवाच्या कृपेने मिळणाऱ्या तारणापासून वंचित होतो, तेव्हा.* म्हणूनच अशा विश्वासणाऱ्याला, *आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की, आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जावा.*

       कर्माप्रमाणे होणाऱ्या न्यायामध्ये विश्वासणाऱ्याच्या ठायी असलेली चांगली - वाईट कर्मे व तो करीत असलेली प्रभूची सेवा ह्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आणि ह्या कर्मांप्रमाणे किंवा सेवेप्रमाणेच त्याला प्रतिफळ मिळेल किंवा तो प्रतिफळाला मुकेल. असे लिहिले आहे की, *आपणां सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो ( २ रे करिंथ ५:१०)* कोणी एसावाप्रमाणे फक्त या जगातल्या गोष्टीत रमून जाऊ नये. अशा व्यक्तीला देव व आत्मिक गोष्टी कचऱ्यासमान वाटतात. आणि जेव्हा ती व्यक्ती शुद्धीवर येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्याने आपले आशीर्वाद गमावलेले असतात. जे त्याला परत मिळविता येत नाहीत. त्याचप्रमाणे विश्वासणारा जर आपल्याठायी पाप नाही असे म्हणत असेल तर तो स्वतःची व देवाचीही फसवणूक करून घेत आहे आणि म्हणून त्याने पश्चाताप करून आपली पापे पदरी घेतली पाहिजे. त्याने आपली पापे पदरी घेतली म्हणजे देव विश्वसनीय व न्यायी असल्यामुळे त्याला त्याच्या पापांची क्षमा करील व त्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील, *( १ ले योहान १:७ ते ९)*

      प्रियांनो आपण आपली पापे पदरी घेऊन, पश्चाताप करून प्रभूजवळ येणे गरजेचे आहे. आणि त्याचे पवित्रीकरण मिळविणे गरजेचे आहे. खराखुरा पश्चाताप करून पापे पदरी घेणे म्हणजे स्वतःचा न्याय करणे, एकमेकांच्याबरोबर सहभागिता मिळविणे आणि प्रकाशात चालणे होय. आपण आपली पापे पदरी घेतली पाहिजेत आणि ख्रिस्ताच्या प्रकाशात चालले पाहिजे, त्याला आपले संपूर्ण समर्पण केले पाहिजे.

*देवाच्या सेवेला खरोखरी वाहून घेतल्याने, त्याच्या इच्छेला अनुसरून आज्ञापालन करीत राहिल्याने प्राप्त होणारी जीवनातील पवित्रता मिळविण्यास आम्ही झटले पाहिजे. अशी पवित्रता नसेल तर कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.*

         *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*
     
     *परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*

                            *प्रार्थना -:*

          *धन्यवादित परमेश्वरा, आमच्या सेनाधीश देवा, तुझी स्तुती करते, तुला सर्व आदर, मान, महिमा, गौरव देते. सुंदर वचनाद्वारे आम्हाला बोध करतोस म्हणून तुझे उपकार मानते. होय प्रभो, आम्ही पापी आहोत, आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आमचे वर्तन, आमचे आचरण तुला आवडणारे असे असावे म्हणून आमच्या अंतःकरणाला स्पर्श कर. तुझ्या पवित्रतेचे वाटेकरी होण्यासाठी आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. ही प्रार्थना तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आमचा उद्धारक ह्याच्या पवित्र नावाने केली म्हणून पित्या तू ऐक.*

          *आमेन आमेन आमेन..!!*

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

                      *वंदना जाधव*
                        *अहमदनगर*
                            *रविवार*
                     *८ सप्टेंबर २०१९*

Comments

Popular posts from this blog

योहान १०:२७

Dream And Visions

फिलिप्पै २:९,१०