प्रेषित २:१७

*पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्यांना धन्यवाद असो..!!*

               *🌟प्रभात तारा🌟*

      *✨सर्वश्रेष्ठ दान - पवित्र आत्मा✨*

*मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील..✍*
                   *( प्रेषित २:१७ )*

                           *...मनन...*

          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*

       परमेश्वराने आमच्यासाठी पवित्र आत्म्याचे दान प्राप्त करून देणे ही एक अभूतपूर्व योजना आखली आहे. देवाने मानवांसाठी पवित्र आत्म्याच्या योगे तारणाची एक मोठी आशा प्राप्त करून दिलेली आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण अनेक अशक्य गोष्टी प्राप्त करू शकतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण आशीर्वादित होऊ शकतो. पवित्र आत्मा आम्हाला चालवतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, आमच्या संगती राहतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होऊ शकतो आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही इतरांच्याही आशीर्वादाचे कारण बनू शकतो. 
 
    त्यासाठी पवित्र आत्मा मिळविण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? वचनाद्वारे पाहू या..

    *१) पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या -* पश्चाताप करणे म्हणजे सर्व पापांपासून वळणे आणि देवापूढे स्वतःला समर्पण करणे, आणि बाप्तिस्मा घेणे म्हणजे केवळ एक विधी म्हणून नव्हे तर आपण वैयक्तिक रितीने व जगासमोर ख्रिस्ताचा स्वीकार करणे व त्याच्या मरणाची, पुरल्या जाण्याची व त्याच्या पुनरुत्थानाची घोषणा आपल्याद्वारे केली जाणे. *पश्चाताप करा, पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. ( प्रेषित २:३८)*

      *२) देवाकडे मागा -* मागणे ही खूप सोपी गोष्ट आहे. आणि प्रभू स्वतः आम्हाला सांगतो की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. *मी तुम्हांस सांगतो, मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. ( लूक ११:९,१०)*

     *३) तान्हेले व्हा -* होय प्रियांनो, आपण प्रभूसाठी, पवित्र आत्म्यासाठी तान्हेले होणे गरजेचे आहे. तान्हेले होणे म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा अधिक मिळविण्याची उत्कंठा बाळगणे होय. ही तहान जगिक नाही तर आत्मिक आहे. प्रभू येशू म्हणत आहे की, *कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. ( योहान ७:३७)*

     *४) येशूकडे येणे -* येशू ख्रिस्त सर्व तान्हेल्यांना त्याच्याकडे येण्यास सांगत आहे. कारण ही तहान आध्यात्मिक तहान आहे आणि ती केवळ तोच भागवू शकतो. पवित्र आत्म्याचे दान केवळ त्याच्यापासूनच प्राप्त होते. कुणाही मनुष्यापासून  आपल्याला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होऊ शकत नाही. प्रभू येशू म्हणतो, *जो माझ्यावर विश्वास ठेवितो त्याच्यातून शास्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ( योहान ७:३८)*

      *५) समर्पित व्हा -* आपण पूर्णपणे देवाला समर्पित झाले पाहिजे. विशेष करून आपण देहाने कुठलीही अनुचित, देवाला न आवडणारी गोष्ट करू नये. कारण देवाने आपल्या शरीराला पवित्र आत्म्याचे मंदीर म्हटले आहे, *तुमचे शरीर, तुम्हांमध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदीर आहे हे तुम्हांस ठाऊक नाही काय ? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. ( १ ले करिंथ ६:१९)*

         प्रियांनो, आपणही पवित्र आत्मा मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, देवाजवळ मागितले पाहिजे, हट्ट केला पाहिजे, मग तो निश्चितच आपल्याला दिल्यांवाचून राहणार नाही. कारण तो स्वतःच आपल्याला मागण्यास सांगत आहे. मग चला तर आपण पश्चाताप करून, बाप्तिस्मा घेऊन प्रभूजवळ येऊ या, त्याला पूर्णपणे समर्पित होऊ या, आणि पवित्र आत्म्याची ही दाने प्राप्त करू या.

          *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*

     *परमेश्वर ह्या वचनाद्वारे आपणां सर्वांना खूप आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्यास साहाय्य करो..!!*

                            *प्रार्थना -:*

          *धन्यवादित परमेश्वरा, आमच्या सेनाधीश देवा, तुझी स्तुती करते, तुला सर्व आदर, मान, महिमा, गौरव देते. सुंदर वचनाद्वारे आम्हाला बोध करतोस म्हणून तुझे उपकार मानते. होय प्रभो, आम्हांसाठी तू पवित्र आत्मा, कैवारी म्हणून दिला आहेस. ह्यासाठी की, आम्ही तुझ्याशिवाय एकटे राहू नये. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्या संगती राहतोस, आम्हाला चालवितोस, आम्हाला शक्ती, सामर्थ्य पुरवितोस म्हणून तुझे उपकार मानते. ही प्रार्थना तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आमचा उद्धारक ह्याच्या पवित्र नावाने केली म्हणून पित्या तू ऐक.*

           *आमेन आमेन आमेन..!!*

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

                      *वंदना जाधव*
                        *अहमदनगर*
                           *सोमवार*
                  *९ सप्टेंबर २०१९*

Comments

Popular posts from this blog

योहान १०:२७

Dream And Visions

फिलिप्पै २:९,१०